विनाशकारी रागावर उपाय..!
आपल्या अनेक नैसर्गिक भाव-भावना असतात, जसे आनंद, दु:ख, समाधान, प्रेम आणि रागसुद्धा..! राग कशाचाही येऊ शकताे. वाहतुकीच्या काेंडीत फसल्यामुळे, घरातून निघण्यास विलंब झाल्याने, किंवा ठरविलेली गाेष्ट मनाप्रमाणे न झाल्यामुळे. राग येताे ही वस्तुस्थिती आहे. राग येण्याचे मुख्य कारण म्हणजे तणाव. रागामुळे घरगुती हिंसाचार वाढतो आणि काैटुंबिक समस्यांमध्ये वाढ होत जाते. म्हणून रागावर नियंत्रण असायलाच हवे. दीर्घकालीन तणावामुळे राग गंभीर स्वरूप धारण करू शकताे. मानसिक विकारांमुळेही संतापी वृत्ती बनत जाते. विशेषत: औदासीन्यग्रस्त लाेकांमध्ये नैराश्याबराेबरच राग वाढल्याचे दिसते. अशा स्थितीत राग केव्हाही आणि कशाचाही येताे आणि शारीरिक, मानसिक दुष्परिणाम हाेतात. त्यामुळे रागाचे नेमके कारण शोधून त्यावर उपाययोजना करायला हव्यात.
असा ओळख राग
मेंदूत आलेल्या काही विचारांमुळेच राग येताे, असे काही नाही. उलट राग आल्यावर विचार मागे पडून शारीरिक हालचाली वाढतात. श्वासाेच्छ्वास वाढणे, थरथरणे, घाम येणे किंवा डाेके दुखायला लागणे अशी लक्षणे राग आल्यावर दिसतात. अशावेळी माणसाचे विचार भावनेत बदलून अनावश्यक बडबड सुरू होते. काही जणांमध्ये सूडाची किंवा दु:खाची तीव्र भावना वारंवार येत राहते. संतापाच्या भरात माणूस जाेरजाेरात बाेलायला लागताे. अशी लक्षण जाणवायला लागल्यास स्वतः नियंत्रित होऊन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न व्हायला हवा. शांत ठिकाणी बसून दीर्घ श्वास घेत अशा परिस्थितून बाहेर यायला हवे. मात्र यासाठी आपल्याला हे काय? आणि का होत आहे? याची जाणीव होणेही गरजेचे आहे. चला तर मग, या लेखाद्वारे आपण रागाची अवस्था जाणून घेऊन, त्यावर प्रभावी उपाय पाहुयात.
रागाचे दुष्परिणाम
सततचा राग मन अस्वस्थ आणि शरीर निष्क्रिय करतो. रागाच्या काळात अनेकांना मेंदू खूप वेगाने काम करत असल्याचा किंवा मेंदूची विचारक्षमता कमी हाेण्याचा अनुभव येताे. अतिरागामुळे डाेकेदुखी, केस गळणे, डाेळ्यांजवळ सुरकुत्या, गळ्याची त्वचा ओढली जाणे आणि श्वासाेच्छ्वास जलद हाेण्याच्या समस्या सुरू हाेतात. मानसिक तणावामुळे आतड्यांचे विकार आणि आतड्यांत जळजळीच्या लक्षणांसारखे पाेटाचे विकारही वाढतात. राग अनियंत्रित झाल्यास बद्धकाेष्ठाबराेबर पाय दुबळे हाेऊ लागतात. अत्यंत संतापी लाेक तणाव मनातच ठेवत असल्यामुळे त्यांचे हात आखडल्यासारखे दिसतात आणि पायांची बाेटे दबलेली असतात. अशा लाेकांचा रक्तदाब वाढलेला असताे आणि त्यांच्यात जीवनसत्त्वांची कमतरताही असते. रागामुळे शरीरावर सूज वाढून राेगप्रतिकारशक्ती कमी हाेते. त्यातून हृदय दुर्बल हाेऊ लागते आणि आनंद निर्माण करणारी संप्रेरके स्रवणे कमी झाल्यामुळे झाेपेचे चक्रही विस्कळीत हाेते.
रागावर प्रभावी उपाय
रागामुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची हानी होते, हे मान्य करणे म्हणजे रागावर नियंत्रण मिळविण्याची पहिली पायरी आहे. रागाची कारणे शाेधणे ही दुसरी पायरी. राग आलेली व्यक्ती त्यासाठी दुसऱ्याकडे बाेट दाखविते. हेच रागाचे वैशिष्ट्य आहे. कायम समाेरच्याला दाेषी मानले जाते. पण त्यात थोडे आत्मपरीक्षण केल्यास राग नियंत्रणात आणता येतो. उदा. जर आपली मुले चुकीची वागत असतील, तर राग येणे साहजिकच आहे; पण अशा वेळेस न रागवता, साैम्यपणे मुलांना समजवण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थिती बिघडत नाही. मनाला अशी सवय लावल्यास नक्कीच रागावर विजय प्राप्त करता येणे शक्य आहे.
क्षमाशील वृत्ती हवी
क्षमा हा मानवी स्वभावाचा सर्वोत्तम अलंकार मानला जातो. क्षमा केल्याने अशक्य गोष्टीही सहज शक्य होतात. याची प्रत्येकाला जाणीव असते. मात्र अनुकरण होताना दिसत नाही. रागाला स्फोटकपणे व्यक्त करण्यापेक्षा तो राग विसरून मनी क्षमाभाव आणणे हा रागावर नियंत्रणाचा सर्वोत्तम उपाय आहे. आपण ज्यांच्यावर रागावतो त्यांचे कुठलेच नुकसान होत नाही जेवढे आपले होते. याचे कायम भान असायला हवे. कधी कधी राग परिस्थीवरसुद्धा येत असतो. असा राग अत्यंत त्रासदायक असतो. वस्तुस्थिती लक्षात घेत स्वतःला आवर घालणे येथे हिताचे ठरते. अतिरागीट स्वभावाचा परिणाम व्यक्तिगत आणि कौटूंबिक जीवनावरही हाेताे. राग आपल्याला कितीही याेग्य वाटत असला, तरी रागात बाेलणे सगळ्यांना दुखावणारेच असते. सर्वानाच तुमच्या रागाचे कारण समजेलच असे नाही. म्हणून क्षमाशील बनता आलेच पाहिजे.
कैलास एन. हिरोडकर संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनएए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा